छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात चार वर्षाच्या चिमुरडी यज्ञावर अमानुष अत्याचार करून निर्घृण हत्येने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. समाजमनाला हादरवून टाकणार्या या घटनेविरोधात सखल सोनार समाजाच्या वतीने आज क्रांती चौकातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
सकाळीच क्रांती चौक परिसरात हजारो नागरिक, महिला, युवक, सामाजिक संघटना आणि विविध समाजघटक मोठ्या संख्येने जमले. सखल सोनार समाजाच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या शांततापूर्ण तीव्र रोष दर्शवणार्या मोर्चात सर्वांच्या हातात यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे, यज्ञाचे प्रकरण जलद न्यायालयात चालवून आरोपींना शिक्षा द्यावी. अशा आशयाचे फलक घेऊन आक्रोश व्यक्त केला. मोर्चात नागरिकांनी कडक घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यज्ञाला न्याय द्या, अपराध्याला तत्काळ शिक्षा द्यावा अशा घोषणांनी संपूर्ण मार्ग दुमदुमून गेला. क्रांती चौका ते विभागीय आयुक्त कार्यालय मार्गे काढण्यात आला. यावेळी यज्ञाच्या हत्येतील आरोपींना सर्वात जलदगतीने कठोर शिक्षा व्हावी, प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करावी. अशी मागणी यावेळी केली.
यज्ञाची ही क्रूर घटना ही समाजाला हादरवून टाकणारी असून, या आक्रोश मोर्चाद्वारे न्याय मिळवण्यासाठी एक ठाम आणि एकजूट आवाज उभा राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. सखल सोनार समाजासह विविध समाजघटकांनी दाखवलेली एकजूट ही भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी महत्त्वाची ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त केली.